शांता शेळके-shanta shelake लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
शांता शेळके-shanta shelake लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
  रविवार, ११ जुलै, २०१०   0 टिप्पणी(ण्या)

मैत्रीचे मी कोनेकोपरे धुंडाळून पाहिले
घट्ट नाती पुन्हा पुन्हा चाचपतच राहिले

मनात मने गुंफताना भरून आला जीव
वाटले आता दुराव्याची ओलांडली मी शीव

प्रत्येक भेटीत पण पुन्हा नवा परिचय
पुन्हा पुन्हा संदिग्धता आणि नवे भय

गहनगूढ अंधारवाटा पाताळविहिरी खोल
क्वचित कुठे तळाशी चुळकाभर ओल

स्पर्शातून जाणवणारे काही स्पर्शातीत
सूर तेच तरी सुद्धा उमगत नाही गीत

रेशीमगाठी काचणा-या, चरत जाणारे व्रण
निकराच्या अंतीम क्षणी निमूट होणारे मन

शांता शेळके

    1 टिप्पणी(ण्या)

शेवटची ओळ लिहीली
आणि तो दूर झाला
आपल्या कवितेपासून
बराचसा थकलेला
पण सुटकेचे समाधानही अनुभवणारा
प्रसूतीनंतरच्या ओल्या बाळंतीणीसारखा
जरा प्रसन्न, जरा शांत
नाही खंत, नाही भ्रांत....

आणि ती कविता नवजात
एकाकी, असहाय, पोरकी
आधाराचे बोट सुटलेल्या
अजाण पोरासारखी
भांबावलेली, भयभीत,
अनुभवणारी एका उत्कट नात्याची
परिणती विपरीत

ती आहे आता पडलेली
कागदाच्या उजाड माळावर
आपल्या अस्तिवाचा अर्थ शोधत
तो मैलोगणती दूर, वेगळ्या विश्वात
संपूर्ण, संतुष्ट, आत्मरत!



शांता शेळके

    0 टिप्पणी(ण्या)

तसे तर शब्द जिवाभावाचे सखेसोबती
श्वासोच्छ्वासाइतके मला निकटचे क्षणोक्षणी
शब्दांच्या आधारानेच सोसत आले आजवर
प्रत्येक आनंद, आघात, आयुष्यातली अधिक उणी

अजूनही जेव्हा मन भरुन येते अनिवार
करावे वाटते स्वत:ला शब्दांपाशी मोकळे
वाटते, त्यांनाच जावे सर्वस्वाने शरण
तेच जाणून घेतील आतले उत्कट उमाळे

तरीही शब्द हाताळताना असते सदैव साशंक
त्यांच्या सुक्ष्म नसा, भोवती धगधगणारा जाळ,
काळीज चिरीत जाणा-या त्यांच्या धारदार कडा
ज्या अवचित करतात विद्ध, रक्तबंबाळ

मी तर कधीचीच शब्दांची. ते कधी होतील माझे?
त्यांच्याशिवाय कुठे उतरू हृदयावरचे अदृश्य ओझे?

शांता शेळके

    0 टिप्पणी(ण्या)

काटा रुते कुणाला,आक्रंदतात कोणी
मज फूल ही रुतावे हा दैवयोग आहे

सांगू कशी कुणाला कळ आतल्या जीवाची
चिर-दाह वेदनेचा मज शाप हाच आहे

काही करू पहातो रुजतो अनर्थ तेथे
माझे अबोलणेही विपरीत होत आहे

हा स्नेह वंचना की काहीच आकळेना?
आयुष्य ओघळोनी मी रिक्त-हस्त आहे

शांता शेळके
हे बंध रेशमाचे