रविवार, २७ फेब्रुवारी, २०११   0 टिप्पणी(ण्या)

माझ्या गोव्याच्या भूमीत सारखी सुंदर कविता लिहिणारे बाकीबाब हे सर्व मराठी रसिकांचे आवडते कवी
सुंदर शब्दचित्रांनी नटलेल्या निसर्गकविता लिहाव्यात तर केवळ बा. भ. बोरकरांनीच! अशीच त्यांची एक सुंदर कविता आहे. जुन्या अभ्यासक्रमामध्ये ज्यांचे प्राथमिक शिक्षण झाले आहे अशा सर्वांना बालभारतीच्या पुस्तकातील ही कविता निश्चितच आताहवत असेल.
ही कविता वाचल्यानंतर जो शब्दचित्रांचा पट आपल्यासमोर उभा राहील त्याचबरोबर आपल्या बालपणातील मुग्ध आठवणी देखील जाग्या होतील ........


विचित्र वीणा

निळ्या जळावर कमान काळी
कुठे दुधावर आली शेते
थंडाव्याची कारंजिशी
कुठे गर्द बांबूची बेटे

जिकडे तिकडे गवत बागडे
कुठे भिंतिच्या चढे कडेवर
ती म्हातारी थरथर कापे
सुखासवे होउनी अनावर

तारांमधला पतंग कोठे
भुलुन गेला गगनमंडला
फणा डोलववीत झोंबू पाहे
अस्त-रवीच्या कवचकुंडला

उंचवट्यावर म्हशी गोठल्या
तसेच कोठे काजळ काळे
वर्ख तृप्तीचा पानोपानी
बघून झाले ओले-ओले

कोठे तुटल्या लाल कड्यावर
चपळ धीट बकरीची पोरे
एक त्यातले लुचे आईला
सटीन कान्ती गोरे गोरे

फुलपाखरी फूल थव्यावर
कुठे सांडली कुंकुमटिंबे
आरस्पानी पाण्यावरती
तरत्या बगळ्यांची प्रतिबिंबे

कुठे आवळीवरी कावळा
मावळतीचा शकून सांगे
पूर्वेला राऊळ इंद्राचे
कोरीव संगमरवरी रंगे

घाटामध्ये शिरली गाडी
अन् रात्रीचा पडला पडदा
पण चित्रांची विचित्र वीणा
अजून करिते दिड s दा दिड s दा

- बाकीबाब (बा. भ. बोरकर)