रविवार, ११ जुलै, २०१०   4 टिप्पणी(ण्या)

शृंखला पायी असू दे, मी गतीचे गीत गाई
दुःख उधळायास आता, आसवांना वेळ नाही
ओस आडोशात केले, पापण्यांचे रिक्त प्याले
मीच या वेडावणार्‍या माझिया छायेस भ्याले
भोवती होते घृणेचे ते थवे घोंघावणारे
संपले होते निवारे बंद होती सर्व दारे
वाडगे घेऊन हाती, जिद्द प्राणांची निघाली
घाबरी करुणा जगाची, लांबुनी चतकोर घाली
माझिया रक्तासवे अन चालली माझी लढाई
दुःख उधळायास आता, आसवांना वेळ नाही
त्या तिथे वळणावरी पण वेगळा क्षण एक आला
एकटे एकत्र आले आणि हा जत्^था निघाला
घोर रात्री श्वापदांच्या, माजलेले रान होते
पांगळ्यांना पत्^थरांचे ते खडे आव्हान होते
टाकलेली माणसे अन् त्यक्त ती लाचार माती
त्यातुनी आले ऋतूंचे भाग्य या घायाळ हाती
पेटती प्रत्येक पेशी मी असा अंगार झाले
आसवे अन् घाम यांचा आगळा शृंगार चाले
वेदनेच्या गर्द रानी गर्जली आनंद द्वाही
दुःख उधळायास आता, आसवांना वेळ नाही
कोंडलेल्या वादळांच्या ह्या पहा अनिवार लाटा
माणसांसाठी उद्याच्या, येथुनी निघतील वाटा
पांगळ्यांच्या सोबतीला, येऊ द्या बलदंड बाहू
निर्मितीची मुक्त गंगा, द्या इथे मातीत वाहू
नांगरू स्वप्ने उद्याची, येथली फुलतील शेते
घाम गाळील ज्ञान येथे, येथुनी उठतील नेते
ह्याचसाठी वाहिली ही सर्व निढळाची कमाई
दुःख उधळायास आता, आसवांना वेळ नाही
बाबा आमटे

4 टिप्पणी(ण्या):

Unknown म्हणाले...

Good

Unknown म्हणाले...

अप्रतिम - भावना आणि कर्तूत्वाचा समन्वय ...

Unknown म्हणाले...

खुप मस्त

Unknown म्हणाले...

Exceelant

Leave a Reply