रविवार, २७ फेब्रुवारी, २०११   0 टिप्पणी(ण्या)

माझ्या गोव्याच्या भूमीत सारखी सुंदर कविता लिहिणारे बाकीबाब हे सर्व मराठी रसिकांचे आवडते कवी
सुंदर शब्दचित्रांनी नटलेल्या निसर्गकविता लिहाव्यात तर केवळ बा. भ. बोरकरांनीच! अशीच त्यांची एक सुंदर कविता आहे. जुन्या अभ्यासक्रमामध्ये ज्यांचे प्राथमिक शिक्षण झाले आहे अशा सर्वांना बालभारतीच्या पुस्तकातील ही कविता निश्चितच आताहवत असेल.
ही कविता वाचल्यानंतर जो शब्दचित्रांचा पट आपल्यासमोर उभा राहील त्याचबरोबर आपल्या बालपणातील मुग्ध आठवणी देखील जाग्या होतील ........


विचित्र वीणा

निळ्या जळावर कमान काळी
कुठे दुधावर आली शेते
थंडाव्याची कारंजिशी
कुठे गर्द बांबूची बेटे

जिकडे तिकडे गवत बागडे
कुठे भिंतिच्या चढे कडेवर
ती म्हातारी थरथर कापे
सुखासवे होउनी अनावर

तारांमधला पतंग कोठे
भुलुन गेला गगनमंडला
फणा डोलववीत झोंबू पाहे
अस्त-रवीच्या कवचकुंडला

उंचवट्यावर म्हशी गोठल्या
तसेच कोठे काजळ काळे
वर्ख तृप्तीचा पानोपानी
बघून झाले ओले-ओले

कोठे तुटल्या लाल कड्यावर
चपळ धीट बकरीची पोरे
एक त्यातले लुचे आईला
सटीन कान्ती गोरे गोरे

फुलपाखरी फूल थव्यावर
कुठे सांडली कुंकुमटिंबे
आरस्पानी पाण्यावरती
तरत्या बगळ्यांची प्रतिबिंबे

कुठे आवळीवरी कावळा
मावळतीचा शकून सांगे
पूर्वेला राऊळ इंद्राचे
कोरीव संगमरवरी रंगे

घाटामध्ये शिरली गाडी
अन् रात्रीचा पडला पडदा
पण चित्रांची विचित्र वीणा
अजून करिते दिड s दा दिड s दा

- बाकीबाब (बा. भ. बोरकर)

  शुक्रवार, २५ फेब्रुवारी, २०११   0 टिप्पणी(ण्या)

गेल्या 10 वर्षातील पिढीबाबत माहिती नाही परंतू त्या आधीच्या अनेक जणांचे बालपण ज्या भारतीय कॉमिक्सनी

समृद्ध केले त्यात अमर चित्रा कथा चा नंबर सर्वात वरचा आहे. भारतीय साहित्य परंपरेतील अतिशय समृद्ध परंपरेची

ओळख या श्रुंखलेने भारतीय मुलांना करून दिली आणि त्यांच्या बालपणाला भारतीय परंपरां, साहित्य, इतिहास, मिथके

यांची केवळ ओळखच करून दिली असे नव्हे तर यांची गोडीही लावली. जगतिकीकरणांनंतर आणि त्यापूर्वीही जेंव्हा

पाश्च्यात्य बालसाहित्य आणि मिथके भारतीय मुलांच्या मनावर मोहिनी घालत होती तेंव्हा यात भारतीय परंपरा कुठे

शोधावी, भारतीय बालसाहित्याची समृद्ध परंपरा नव्या पिढीसमोर कशी ठेवावी याबाबत बहुसंख्य पालक संभ्रमावस्थेत होते

त्यावेळेस हे शिवधंनुष्य पेलले ते अमर चित्र कथेने. जवळपास आता प्रौढ असलेल्या दोन पिढ्यांच्या बालपणीच्या

भाव-विश्वाला या चित्रकथांनी अतिशय समृद्ध करून ठेवल्याची तृप्ततेची भावना या पिढ्यातील अनेक जणांच्या मनात

उजळ आहे. एवढ्या सुंदर रीतीने भारतीय परंपरांची ओळख (त्या कितीही वादग्रस्त आणि मिथकीय असल्या तरी) त्यांना दुसरी कुणीही करून दिली नसेल.

ज्या व्यक्तींनी ही चित्रकथा मालिका सुरू केली त्यापैकी एक अनंत उर्फ अंकल पै यांचे काल निधन झाले. आपण कृतज्ञता म्हणून आज
त्यांना श्रद्धांजली वाहूया. त्यांच्याबद्दल आणखी माहिती आजच्या लोकसत्ता वर्तमानपत्रात आली आहे ती येथे साभार देत आहे.

.... आणि हो... ज्यांनी ही कॉमिक्स वाचली नसेल ते खरेच अभागी आहेत. परंतु ते आताही त्या वाचू शकतात, अगदी तुम्ही कुठल्याही वयाचे असलात तरी .... खरेच.... मीसुद्धा अजूनही त्या कथा वाचतो ... आणि ज्यांनी त्या बालपणी वाचलेल्या असतील त्यांनाही या चित्रकथांचे पुंनर्वाचन स्मरणरंजनाचा (nostalgia) आनंद निश्चितच देईल याची गॅरंटी माझी.


येथे क्लिक केल्यास अमर चित्र कथा ची साईट उघडेल